प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – ता. ३० जुलै – खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी बँक तसेच आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढविणे केंद्र शासनाच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशक्य असल्याने अशा स्वरुपाच्या कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये दिनांक ३१ जुलैपर्यंत विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे.

राज्यातील वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सूचना कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर व संबंधित विमा कंपन्यांना निर्गमित करण्यात आल्या आहेत. योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचेशी संपर्क साधावा, असेही कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *