Maharashtra Politics: भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर ।। राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरलेत. एकीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी महायुतीला एकापाठोपाठ एक धक्के देत असतानाच आता उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेत इनकमिंग सुरु झाले आहे. आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असून महायुतीला दुहेरी धक्का बसणार आहे.

ठाकरे गटात इनकमिंग!
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंनी जोर का झटका दिला आहे. अजित पवार आणि भाजपची साथ सोडून आज दोन बडे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणातील भाजप नेते राजन तेली, सांगोल्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे आणि चिंचवड येथील मोरेश्वर भोंडवे हे नेते आज मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत.

मातोश्रीवर ३ मोठे पक्षप्रवेश
राजन तेली हे भाजपचे सावंतवाडी मतदारसंघातील बडे नेते असून त्यांनी दिपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा लढवण्यासाठी ठाकरे गटाचा मार्ग निवडला आहे. आज सायंकाळी पाच वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दुसरीकडे सांगोल्यातून अजित दादा गटाचे दीपक आबा साळुंखे यांचा संध्याकाळी 4 वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला होता. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंत दीपक आबा साळुंखे हे शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. चिंचवड येथील अजित दादा गटाचे मोरेश्वर बोन्डवे यांचा 6 वाजता पक्ष प्रवेश होणार आहे.

दरम्यान, विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही पत्रकार परिषद होईल. मविआचे जागा वाटप अद्याप पुर्ण झाले नाही. काही जागांवर अजूनही तिढा असल्याने आज पुन्हा बैठक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *