महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर ।। पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून धडक कारवाई केली आहे. नेमकं घडलंय काय आणि पुणे पोलिसांनी अशी कारवाई का सुरु केली..
पुण्यात कार आणि बाईक चालवता येत असेल तर तुम्ही जगात कुठेही वाहन चालवू शकता, असं अनेकदा म्हटलं जातं. यामागील कारण म्हणजे पुणे हा वाहतुकीचे नियम न पाळण्यासाठी (कु)प्रसिद्ध आहे. मात्र वाहतुकीच्या नियमांबद्दल बेशिस्त पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी आता पोलिसांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. पुण्यात वाहतुक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करणार आहेत.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपोझिट साईडने म्हणजेच विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास दोषी व्यक्तीचं वाहन सहा महिन्यांसाठी जपत केलं जाणार आहे. तसेच पुणे पोलिसांकडून आता ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध, सिग्नल तोडणाऱ्यांविरुद्ध तसेच ड्रींक अँड ड्राईव्हविरुद्ध मोहीम सुरु करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी गेल्या 15 दिवसमध्ये तब्बल 25 हजार वाहनचालकांवर वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी मागील 15 दिवसांमध्ये 200 जणांविरुद्ध वाहन जप्तीची कारवाई केली असून आता सहा महिने त्यांची वाहने पुमे पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत. म्हणजे या पुणेकरांना आता थेट मार्च आणि एप्रिल महिन्यात या वाहनांचा ताबा मिळणार आहे. पुणे पोलिसांकडून शहरामध्ये दोन शिफ्टमध्ये तब्बल 850 पोलीस कर्मचारी रस्त्यावरील वाहतुकीच्या नियंत्रणाचं काम करत आहेत. त्यानंतरही वारंवार नियमांचं उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.