महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑक्टोबर ।। महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दिल्लीमध्ये एका व्यायामशाळेच्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधून बिश्नोई टोळीच्या योगेश कुमारला नुकतीच अटक झाली. हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत असताना त्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यात त्याने बाबा सिद्दीकी यांच्यावर विविध आरोप केले आहेत. “बाबा सिद्दीकी हे चांगले व्यक्ती नव्हते, त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. तसेच त्यांचे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे संबंध होते”, असा दावा योगेश कुमारने केला आहे.
योगेश कुमारने सांगितले की, बाबा सिद्दीकी हा काही चांगला माणूस नव्हता. त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सामान्य माणसावर तर असा गुन्हा दाखल होत नाही. तसेच त्यांचे दाऊदशी संबंध होते, असेही कळते. दरम्यान योगेश कुमारने कोठडीत असतानाही पत्रकार परिषद घेतल्याच्या थाटात माध्यमांशी संवाद साधल्यामुळे पोलिसांवरही टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सदर व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर टाकून भाजपावर टीका केली आहे.
मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेवू दिली जाते?
दाल मे कुछ काला है!#LawlessState pic.twitter.com/uq10mxHA8S— Nana Patole (@NANA_PATOLE) October 19, 2024
नाना पटोले म्हणाले, “मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपाच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेऊ दिली जाते? दाल मे कुछ काला है.”