महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑक्टोबर ।। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या मुहूर्तावर संपूर्ण देश शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगची आतुरतेने वाट पाहत असून ‘मुहूर्त’ किंवा शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्याने गुंतवणूकदारांना वर्षभर समृद्धी लाभते असे मानले जाते. यावर्षी मुहूर्त ट्रेडिंगसाठी गुंतवणूकदारांमध्ये दोन तारखांमध्ये संभ्रम पाहायला मिळत होता पण आता मुहूर्त ट्रेडिंगची तारीख आणि वेळेबाबतचा संभ्रम स्वतः एक्सचेंजेसने दूर केला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेल्या विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्राची वेळ जाहीर केली आहे.
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आणि तारीख जाहीर
दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगची संपूर्ण देश वाट पाहत असतो. एक तास चालणाऱ्या या विशेष ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदार ट्रेडिंग करतात. तर या वेळी दिवाळीच्या दिवशी होणाऱ्या या ट्रेडिंग सत्राबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही जण म्हणतात की मुहूर्त ट्रेडिंग ३१ ऑक्टोबरला होईल तर काहीजण १ नोव्हेंबरला होणार असल्याबद्दल बोलत आहेत. अशा स्थितीत, आता याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.
एनएसई आणि बीएसई शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी एक तासाचे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र आयोजित करतील. स्टॉक एक्सचेंजने वेगवेगळ्या परिपत्रकाद्वारे याची घोषणा केली आहे. परिपत्रकात नमूद केले आहे की व्यापार सत्र शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत होईल.