महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑक्टोबर ।। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भाजपाने काल (२० ऑक्टोबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक संभाव्य याद्या समोर येऊ लागल्या. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना आता राज ठाकरेंनीही मैदानात उडी घेतली आहे. त्यांनीही आज दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. ते डोंबिवली बोलत होते.
“उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. आज किंवा उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल. पण त्यापूर्वी कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. येत्या २४ तारखेला मी दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहे”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे आले होते. कल्याण ग्रामीणमधून मनसेतर्फे राजू पाटील हे एकमेव उमेदवारीचे दावेदार आहेत. तेथेच त्यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या नावांची घोषणा केली.