महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑक्टोबर ।। भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे पुणे कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत पुनरागमन करेल का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उद्यापासून सुरू होणा-या पुणे कसोटीवर पावसाचे सावट आहे. सध्या भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, गहुंजे येथे पहिले तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण असून पाऊस नसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
सध्या स्थितीत हवामान विभागाच्या माहितीनुसार दि. 24, 25 आणि 26 ऑक्टोबर या तीन दिवशी केवळ ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची 1 टक्के शक्यता आहे. रविवार दि. 27 ऑक्टोबर रोजी दिवसभर वातावरण बदलत राहिल. कहीवेळ ऊन तर काहीवेळ ढगाळ वातावरण असणार आहे. पावसाची शक्यता 25 टक्के वर्तविली आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर) सकाळच्या टप्प्यात ऊनाचा तडाखा जाणवणार असून दुपारी ढगाळ वातावरणासह तब्बल 42 टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या पाच ही दिवसामध्ये हलक्या पावसाचे सावट असून ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले. यापूर्वी बंगळुरू येथील पहिल्या कसोटीमध्ये पावसाचा व्यत्यय आला होता. तर त्या आधी बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटीतही पावसामुळे अडीच दिवसांचा खेळ वाया गेला होता.
खेळपट्टीवर फिरकीपटूंची महत्त्वाची भूमिका
पुण्याच्या खेळपट्टीवर फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. येथील खेळपट्टी संथ असल्याचे बोलले जात आहे. पुण्याच्या खेळपट्ट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या मातीत सामान्यतः उसळी नसल्यामुळे ती फिरकीला अधिक अनुकूल आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत भारताचे फिरकीपटू अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. परिणामी कर्णधार रोहित तीन फिरकी गोलंदाजांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देऊल अशी चर्चा आहे.
पुण्यातील टीम इंडियाचे रेकॉर्ड?
गहुंजे येथील स्टेडियममध्ये आतापर्यंत फक्त 2 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी एक सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एक सामना गमावला आहे. पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेला होता ज्यात टीम इंडियाने एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला ज्यात ऑस्ट्रेलियाने 333 धावांनी विजय मिळवला.