महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑक्टोबर ।। महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण शरद पवार यांनी आपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत ५० जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये युगेंद्र पवार यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा आमनासामना होणार, हे आता निश्चित झालेय. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024:)
युगेंद्र पवार तयारीला लागले –
लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्या युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी बारामतीमधून उमेदवारी दिल्याचे समोर आलेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म देण्यात आलाय. त्यानंतर युगेंद्र पवार तयारीला लागले आहेत. युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मालमत्तेवर थकबाकी नसल्याबाबतचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात पुतण्या उभा राहणार हे निश्चीत आहे.
५० जणांना एका दिवसात एबी फॉर्मचे वाटप –
राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकाच दिवसात सुमारे 50 AB फॅार्मचे वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या पक्षासोबत असलेल्या सर्व आमदारांनी देखील AB फॅार्म दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व ५० जणांचा पहिल्या यादीत समावेश आहे.
मराठवाडा आणि विदर्भ अशा दूरच्या उमेदवारांना पक्षाकडून AB फॅार्मच वाटप झाले आहे. बारामतीचे युगेंद्र पवार आणि मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभेच्या उमेदवार राखी जाधव यांनाही AB फॅार्म देण्यात आलाय. पक्षाच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना AB फॅार्म दिल्यानंतर कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.