महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑक्टोबर ।। मनसेचे पुण्यातील दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खडकवासला मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. मनसेकडून मयुरेश वांजळेला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आल्यामुळे खडकवासला मतदारसंघामध्ये महायुतीसोबत महाविकास आघाडीचे देखील टेन्शन वाढले आहे.
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मयुरेश वांजळे यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठांची ते भेट घेत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची मयुरेश वांजळे यांनी भेट घेतली होती. अखेर मंगळवारी रात्री मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार मनसेकडून मयुरेश वांजळेंना तिकीट मिळाले आहे.
मयुरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे खडकवासला मतदारसंघामध्ये इतर पक्षांचे टेन्शन वाढले आहे. खडकवासलामध्ये अजित पवारांना हा सर्वात धक्का असल्याचे म्हटले जात आहे. मयुरेश वांजळे यांची बहीण सायली वांजळे अजित पवार गटाच्या नगरसेविका आहेत. मयुरेश वांजळे हे मनसेचे माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र आहेत. मयुरेश वांजळे मनसेकडून निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मयुरेश वांजळे यांचे वडील रमेश वांजळे यांची पुण्यामध्ये गोल्डमॅन म्हणून ओळख होती. २००९ मध्ये रमेश वांजळे यांनी मनसेच्या तिकीटावर उमेदवारी घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. मनसेचे आमदार असताना त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलनं देखील केली. २०११ मध्ये रमेश वांजळे यांचं निधन झालं. त्यांची कन्या सायली वांजळे ही त्या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेवक आहे. पुण्यात सोनेरी आमदार म्हणून रमेश वांजळे यांची ओळख होती. तोच वारसा पुढे घेत मयुरेश वांजळेसुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.