ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ फेब्रुवारी ।। गझल गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. २६ फेब्रुवारी २०२४ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. गेले अनेक दिवस ते या आजाराशी लढत होते. माक्ष त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे आणि पंकज यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांचं आज सकाळी ११ वाजता मुंबईत निधन झालं आहे. काही काळ त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पद्मश्री पंकज उधास यांच्या प्रदीर्घ आजाराने झालेल्या दुःखद निधनाची माहिती आम्ही अत्यंत जड अंतःकरणाने देत आहोत. असं यावेळी पंकज यांचे कुटूंबीय म्हणाले. ही बातमी समजताच सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेक कलाकार आणि गायक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. गायक सोनू निगमने त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सोनूने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं की, ‘माझ्या बालपणीचा सर्वात महत्त्वाचा भाग आज हरवला आहे. श्री पंकज उधास जी, मला तुमची नेहमी आठवण येईल. तुम्ही नाही हे जाणून माझं मन रडतं आहे. तिथे असण्याबद्दल धन्यवाद. शांती.’ मिळालेल्या माहितीनुसार, पंकज उधास यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झाले असून ते गेल्या काही महिन्यांपासून कुणालाही भेटत नव्हते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

‘चिठ्ठी आयी है’ या गझलेनेच त्यांना खरी ओळख मिळाली. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ चित्रपटात हा गझल घेण्यात आला होता. पंकज उधास हे गझल गायनाच्या विश्वातील एक मोठं नाव होते. पंकजने ‘ये दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आयी’, ‘चले तो कट ही जायेगा’ आणि ‘तेरे बिन’ अशा अनेक गझलांना आपला आवाज दिला होता. आता त्यांच्या निधनाच्या बाचतमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *