महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ ऑक्टोबर ।। भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिल्यामुळे भोसरीमध्ये महाविकास आघाडीने भाजप समोर तगडे आव्हान उभे केले असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. भाजपला एकतर्फी वाटणारी भोसरी मतदारसंघाची निवडणूक गव्हाणे यांच्या माध्यमातून ‘ रेस ‘ मध्ये आली आहे. दहा वर्षातील भ्रष्टाचार, नागरिकांमधील नाराजी , स्वकीयांचा अंतर्गत विरोध यामुळे भाजपला ही निवडणूक सोपी नाही असे चित्र भोसरी मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघावर गेली दहा वर्षे आमदार
भाजपचे महेश लांडगे कार्यरत आहे. आमदार लांडगे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असले असले, तरी महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. लांडगे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असणाऱ्या गटाला बरोबर घेऊन महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरी जात असून, अजित गव्हाणे यांनी या निवडणुकीला रंगत आणली आहे.
…..,……….
भाजपा समोर तगडे आव्हान!
आमदार महेश लांडगे 2014, 2019 असे सलग दोन वेळा निवडणुकीला सामोरे गेले. मात्र या दोन्ही वेळी त्यांच्यासमोर शिवसेनेच्या सुलभा उबाळे आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे होते. आता पुन्हा भाजपने आमदार लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, ही निवडणूक लांडगे यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही. शहरातील तिन्ही मतदारसंघांच्या तुलनेत महाविकास आघाडीने भोसरी मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वेळोवेळी याबाबत आढावा घेत आहेत. त्यामुळे प्रचाराला दोन महिन्यांपासून सुरुवात करत अजित गव्हाणे यांनी भोसरी मतदारसंघ पिंजून काढला . आमदार लांडगे यांचे विरोधक आणि नाराज गटातील लोकांना एकत्र आणून त्यांनी आघाडी घेतली आहे. गेल्या दहा वर्षात भोसरी मतदारसंघात आलेला निधी, त्याचा वापर, विकासाच्या बाबत सेट केलेले खोटे दावे, रस्त्यांची स्थिती, खड्डे, पावसाळ्यात निर्माण झालेली विदारक स्थिती, गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या विषयांवर न झालेला पाठपुरावा अशा सर्व गोष्टींना गव्हाणे यांनी मतदारांच्या समोर ठेवले आहे. त्यामुळे लांडगे यांना सोप्पी वाटणारी निवडणूक गव्हाणे यांनी अटीतटीची करून ठेवली आहे.