महायुतीचे उमेदवार शंकर जगताप ‘सोमवारी’ भरणार उमेदवारी अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ ऑक्टोबर ।। दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात वसूबारस दिनाचा शुभमुहूर्त साधून भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय – मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप हे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार अश्विनी जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष निलेश तरस, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर हे उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी सकाळी ९ वाजता लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन भव्य महारॅलीचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर पिंपळे गुरव बस स्टॉप, भगतसिंग चौक, जवळकर नगर येथून पिंपळे सौदागर येथील स्वराज हॉटेल, रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तापकीर चौक, काळेवाडी मार्गे थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

या भव्य महारॅलीत महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मात्र चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन शंकर जगताप यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यानंतर संपूर्ण चिंचवड मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे प्रचाराला लागले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच शंकर जगताप यांचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *