महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -मुंबई – ता. १ ऑगस्ट -दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दूधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचं आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली होती. आज या आंदोलनाला विविध गावांतून सुरुवात झाली आहे. अनेक गावांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकरी हे रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत.
दूधाला प्रति लिटर किमान 30 रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर 10 रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, 26 जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून 10 लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान 50 रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने 20 जुलै पासून राज्यात आंदोलन सुरू आहे. त्यावर आजपासून आता हे आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.