महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ऑक्टोबर ।। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. याबरोबरच राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, अशातच आता मुख्यमंत्रीपदाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कुणाची सत्ता येईल आणि कोण मुख्यमंत्री बनेल, याबाबत राज ठाकरे यांनी भाकीत वर्तवलं आहे.

राज ठाकरे यांनी नुकताच एबीपी न्यूज वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना महाराष्ट्रात कुणाची सत्ता येईल आणि पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना त्यांनी थेट नेत्याचे नावच सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले, “मला वाटतं, की राज्यात महायुतीचं सरकार येईल आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल. जेव्हा २०२९ मध्ये तुम्ही मला हा प्रश्न विचाराल, तेव्हा मी सांगेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण लिहून ठेवा.” पुढे बोलताना, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? असं विचारलं असता,“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वाटतं, ते नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकतात” असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेने वरळीत उमदेवार दिला नव्हता. त्यामुळे आता अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना उद्धव ठाकरे उमेदवार देतील की नाही, अशी चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरेंना महेश सावंत यांनी उमेदवारी जाहीर केली. याबाबत विचारलं असता, “मी आदित्यसाठी विचार केला होता की माझ्याविरोधातला पक्ष असला तरी राजकारण आणि नातेसंबंध हे मी वेगळं बघतो. मी लहानपणापासून त्या विचारात वाढलोय. मला तेव्हा असं वाटलं की वरळीत आदित्यच्या समोर उमेदवार नको उभा करूयात. हा माझा विचार झाला. मी जसा विचार करतोय, तसा सूज्ञ समोरचाही विचार करेलच अशी मी अपेक्षा नाही धरत. मी ती गोष्ट चांगल्या विचारानं केली. समोरच्याला तसं वाटलं तर त्यांनी करावी, नाहीतर करू नये”, असं राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *