भाजप पुन्हा ‘त्यागा’च्या तयारीत; महाशक्तीकडून शिंदेंना मोलाचं आश्वासन?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मार्च ।। राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप रखडलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन घेतलेली शहांची भेट यानंतरही जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांची आज पुन्हा बैठक होईल. त्यात जागावाटपाचं सूत्र ठरेल अशी दाट शक्यता आहे.

भाजपच्या विदर्भातील नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत पक्षाला मोठा वाटा मिळेल. भाजप महायुतीत सिंहाचा वाटा घेईल. कारण आम्ही या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणार आहोत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार वाटाघाटीत खूप जोर लावत आहेत. पण ते तात्कालिक फायदा पाहत आहेत. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी लोकसभेच्या काही जागा सोडायला हव्यात.

२०१९ मध्ये अखंडित शिवसेनेनं भाजपसोबतच्या युतीत लोकसभेच्या २३ जागा लढवल्या आणि १८ जागा जिंकल्या. त्यात विदर्भातील तीन (रामटेक, बुलढाणा आणि यवतमाळ) जागांचा समावेश आहे. ‘शिवसेना अखंडित असल्यानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड असल्यानं त्यावेळी विदर्भात यश मिळालं होतं. आता पक्षफुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेला त्या जागांवर विजय मिळेलच याची खात्री देता येत नाही,’ असं म्हणत भाजप नेत्यानं शिंदेंच्या शिवसेनेच्या विजयी होण्याबद्दल शंका व्यक्त केली.

महाविकास आघाडीत असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार व्हिक्टिम कार्ड खेळतील. पक्ष फुटल्याचं सांगून अधिकाधिक सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असं भाजप नेत्यानं सांगितलं. शिवसेनेकडे असलेल्या रामटेक मतदारसंघासाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे इथले विद्यमान खासदार कृपाल तुमाने शिंदे गट सोडून भाजपमध्ये जातील अशी शक्यता आहे. तुमाने यांनी ही शक्यता फेटाळली आहे.

रामटेकमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘मित्रपक्षांचे हात पिरगळण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. अजित पवारांना महायुतीत घेण्याची खरंतर काहीही गरज नव्हती. आता भाजप रामटेकवरुन आम्हाला कोंडीत पकडत आहे. आम्ही या मतदारसंघात आतापर्यंत अनेकदा विजय मिळवला आहे,’ असं सेना नेत्यानं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *