महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ नोव्हेंबर ।। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कल्याण आणि ठाण्यामधील जाहीर सभांमधून फोडला. ठाणे मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अविनाश पाटील यांच्यासाठी घेतलेल्या ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. मतदारांना बदलासाठी मतदान करण्याचं आवाहन करताना राज ठाकरेंनी खोचक पद्धतीने राज्यात अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या बंडखोरीसंदर्भात भाष्य केलं.
युतीमधला एका पक्ष उठतो आणि…
“कोणी काहीही धिंगाना घालत आहे. तुम्ही आठवून बघा, तुम्ही दिलेलं मत आता सध्या कुठे फिरतंय? कोणाकडे आहे ते मत माझं. शिवसेना भाजपाला म्हणून लोकांनी मतदान केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीला म्हणून लोकांनी मतदान केलं. अजित पवार यांनी एक सकाळचा शपथविधी केला आणि ते निघून गेले. मग युतीमधला एका पक्ष उठतो आणि ज्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन मुख्यमंत्री पद आपल्या स्वार्थासाठी पदरात पाडून घेतो. मग अडीच वर्ष तो माणूस मुख्यमंत्री राहतो,” असं राज यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेसंदर्भात भाष्य करताना म्हटलं.
मुख्यमंत्री शिंदेंना खोचक टोला
“अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री असताना आपल्या खालून 40 आमदार निघून जातात याचा थांगपत्ता लागत नाही मुख्यमंत्र्यांना! 40 आमदार निघून जाताना त्या 40 आमदारांचा म्होरक्या म्हणतो, “गेले अडीच वर्ष मला कसं तरी होत होतं. का होतं होतं तर अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायला भयंकर त्रास होत होता म्हणून मी हे 40 आमदार घेऊन बाहेर पडलो आणि त्यामुळे मी भाजपाबरोबर सत्तेमध्ये आहे. वर्षभरात लक्षात आलं की ज्याच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली होती ते अजित पवार मांडीवर येऊन बसले आहेत. आता घुसमट बिसमट काही नाही,” असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला.
लाज वाटली पाहिजे मतदार म्हणवून घ्यायची
राजकीय गोंधळाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी मतदारांना, “यासाठी मतदान होतं का? यासाठी उन्हामध्ये रांगेत उभे राहता. यांनी वाटेल ती थेरं करायची. वाटेल त्या गोष्टी करायच्या. या गोष्टी का होतात? कारण तुम्हाला गृहीत धरलं जातं. कोण तुम्ही मतदार? गुलाम आहात, गुलाम! लाज वाटली पाहिजे तुम्हाला मतदार म्हणवून घ्यायची. यांच्यासाठी तुम्ही जन्माला आलात? यांच्यासाठी तुम्ही उन्हातान्हात उभं राहून मतदान करायचं. यांनी वाटेल त्या खेळी करायच्या. वाटेल त्या विचारांशी प्रतारणा करायची. नंतर पाच वर्षांनी पुन्हा त्याच लोकांना जाऊन मतदान करायचं, यासाठी जन्म झाला आहे का तुमचा?” असा सवाल विचारला.