महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ नोव्हेंबर ।। गेल्या सहा महिन्यांत भाव वाढल्यानंतरही दिवाळीत सोने खरेदीत उत्साह दिसून आला. मुहूर्त, लग्नसराई आणि गुंतवणूक या सर्वांचा मेळ घालत सोने खरेदी करण्यासाठी शहरातील सराफ पेढीत खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे यंदा देखील सराफ बाजाराला झळाळी येत मोठी उलाढाल झाली.
बाजारात आलेले नवीन प्रकारचे दागिने आणि लग्न किंवा इतर दुसऱ्या कारणांसाठी होणारी खरेदी यामुळे सराफ पेठेत दिवाळीच्या काळात गर्दी दिसून आली. ग्राहकांचा प्रतिसाद असल्याने सराफ व्यावसायिकांमध्येदेखील उत्साह होता. दिवाळीच्या कालावधीमध्ये सोन्याच्या विक्रीने नवीन उच्चांक नक्कीच गाठलेले आहेत. वजनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर गतवर्षीपेक्षा दहा ते पंधरा टक्के सोन्याची विक्री कमी झालेली आहे. मात्र, मूल्याच्या संदर्भात उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
एक लाखाचा टप्पा पार करणार ?
■ सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव येत्या एक ते दीड वर्षामध्ये एक लाख रुपयाचा टप्पा पार करेल, अशी खात्री आहे. कारण जगभरामध्ये दोन युद्ध सुरू आहेत. युद्धाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता दिसत असल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक वाढताना दिसत आहे. पुढील पाच वर्षांमध्ये सोन्याचा भाव एक लाख ६८ हजार ते दोन लाख रुपये होईल, अशी दाट शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.