महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. ४ ऑगस्ट – ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित केल्या जात असलेल्या लसीच्या उत्पादनासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिटयुटशी करार करण्यात आला आहे. या लसीचे पहिल्या टप्प्यातील निकाल सकारात्मक आले आहेत. या पार्श्वभुमीवर सिरमकडून दुसऱया व तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणीला परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या तज्ञ समितीने दोन दिवसांपुर्वी सुधारीत प्रस्ताव सादर करण्याची सुचना केली होती. त्यानंतर आज या समितीने चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे लवकरच या लसीच्या मानवी चाचणीला हिंदुस्थानात सुरूवात होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी मांजरी येथील सिरम इन्स्टिटयुटला अचानक भेट दिली. त्यांनी संस्थेमध्ये कोरोना लसीची चाचणी व निर्मिती संदर्भात माहिती घेतल्याचे समजते. हिंदुस्थानात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱया व तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापार्श्वभुमीवर पवार यांची भेट महत्वाची मानली जात आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी दुपारी संस्थेला अचानक भेट दिली. सुमारे अडीच-तीन तास ते संस्थेत होते. त्यांनी ऑक्सफर्ड लसीचे आतापर्यंतचे निकाल, मानवी चाचण्या, लसीचे उत्पादन, संस्थेची तयारी तसेच इतर बाबींची माहिती घेतल्याचे समजते. कोरोना काळात पवार यांनी या संस्थेला पहिल्यांदाच भेट दिली आहे. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.