महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. ४ ऑगस्ट – मंगळवार व बुधवारी दोन दिवस राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘रेड अॅलर्ट’ दिला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांत 4 व 5 ऑगस्ट रोजी मोठ्या पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, तर अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने मान्सूनचा जोर वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात 4 ते 7 ऑगस्ट, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात 4 ते 6 ऑगस्ट, तर विदर्भात 4 व 5 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारली असली, तरी मंगळवारपासून राज्यात बहुतांश भागात मान्सून सक्रिय होत आहे. 4 ते 7 ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर, सांगली, पालघर, नाशिक, बीड या भागात मुसळधार, तर उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.