महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अयोध्या – ता. ४ ऑगस्ट – गेल्या कित्येक वर्षांपासून भारत वासियांसाठी बहुप्रतिक्षीत असलेल्या राम मंदिर निर्मितीचे भूमिपूजन रामजन्मभूमी अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या सोहळ्याला अंतिम स्वरुप देण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तब्बल चार तास आढावा घेतला. यासाठी त्यांनी अधिकारी, तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी तसेच स्थानिक लोक प्रतिनिधींची बैठकही घेतली.
राममंदिर भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सलिल सिंघल असून ते राममंदिर आंदोलनातील सक्रीय नेते अशोक सिंघल यांचे ते पुतणे होते. पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला राममंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत येणार आहेत. त्यांच्या या दौर्यासाठी कडेकाट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून त्यांच्या दौर्याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे.
राममंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त दुपारी 12 वाजून 32 ते 12 वाजून 42 मिनिटापर्यंत आहे. यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी अकरा वाजून 40 मिनिटांनी अयोध्येतील साकेत महाविद्यालयाच्या प्रांगणातील हेलिपॅडवर पोहोचणार आहेत. तेथून ते थेट हनुमान गढी मंदिरात जाणार आहेत. तिथे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी श्री राम जन्मभूमि परिसरात पोहोचणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर ते नियोजित मंदिरास्थळी जावून भूमिपूजन करणार आहेत. सर्व निमंत्रितांना भूमिपूजन सोहळ्यासाठी सकाळी साडेदहा वाजण्यापूर्वी पोहोचणे अनिवार्य आहे. त्यानंतर कोणालाही तिथे प्रवेश मिळणार नाही. सर्वांना समारंभस्थळी पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी दोन तास आधी पोहाचणे गरजेचे आहे. दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
सोमवारपासून अनुष्ठानास प्रारंभ : मंदिराच्या भूमिपूजनासाठी आयोजित तीन दिवसांच्या अनुष्ठानाचा आज पहिला दिवस होता. सोमवारी गौरी- गणेश पूजन, कुलदेवीचे म्हणजेच नवग्रहाचे पूजन करण्यात आले. मंगळवारी प्रभू रामाचे पूजन होणार आहे. तर बुधवारी भूूूूूमिपूजन अनुष्ठानाचा तिसरा दिवस असेल. यादिवशी सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान येथे पोहोचणार आहेत. व्यासपीठावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या चारही बाजूंनी सील करण्याची तयारी सुरु आहे. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्यनंतर अयोध्येत कोणालाही अयोध्येत प्रवेश मिळणार नाही. अयोध्या जिल्ह्याच्या शेजारील जनपद बस्ती, गोंडा, आंबेडकरनगर, बाराबंकी, सुलतानपूर, अमेठी आदी ठिकाणी नोडल अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. जलमार्गांवरही विशेष पाळत ठेवण्यात येणार आहे. अयोध्येला जोडलेल्या छोट्या-मोठ्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लावली आहेत.