Maharashtra Weather News : राज्याचा ‘या ‘ भागात गारठा आणखी वाढणार ; पहा हवामान अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ नोव्हेंबर ।। राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानातील चढ- उतार अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं उष्मा अधिक जाणवू लागला आहे. तर, घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र पहाटेच्या वेळी असणारं तापमान काही अंशांनी कमी झाल्याचं लक्षात येत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या उत्तरेकडे असणाऱ्य़ा जिल्ह्यांमध्ये तापमानात घट नोंदवली जात आहे. इथं तापमान 13 अंशांपर्यंत खाली आलं असून, आता उर्वरित जिल्ह्यांवरही त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात. पुढील 24 तासांमध्ये धुळ्यातील तापमानावर लक्ष राहणार असून, इथं राज्यातील नीचांकी आकडा गाठला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थोडक्यात उत्तर महाराष्ट्रात 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानासह गारठा दिवसागणिक वाढत जाणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तिथं पश्चिम महाराष्ट्रात काही भागांमध्ये तापमानात चढता आलेख दिसत असला तरीही दिवस मावळतीला जाताना मात्र इथंही थंडीची चाहूल लागत असल्याचं स्पष्ट होत आहे. कोकण पट्ट्यामध्ये सध्या अपेक्षित गारठा पडलेला नाही, तर मध्य महाराष्ट्रात मात्र थंडीची चांगली सुरुवात होत असल्याचं चित्र आहे. निफाडमध्येही नीचांकी तापमानाचा समाधानकारक आकडा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळं नव्या आठवड्यात हवामान नेमकं कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

राज्यात रत्नागिरीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं तापमानाचा आकडा 35.9 अंशांवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणी या गिरीस्थानांवर तापमानात समाधानकारक घट पाहायला मिळत आहे. इथं सध्या तापमानाचा किमान आकडा 17 ते 18 अंशांदरम्यान असून येत्या काळात इथं आणखी गारठा अपेक्षित असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसा सूर्याचा आगडोंब कायम राहणार असून रात्री उशिरा तापमानात घट अपेक्षित आहे. ज्यामुळं पहाटेपर्यंत गारठा जाणवण्याची शक्यता आहे. शहरी भागांमध्ये हवेत धुरक्यांचं प्रमाण अधिक राहील, तर ग्रामीण क्षेत्रांमध्ये त्यातही प्रामुख्यानं घाटमाथ्यावर धुक्याचं प्रमाण अधिक राहणार असल्यामुळं आरोग्यावर या हवामानबदलांचे थेट परिणाम होताना दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *