महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ नोव्हेंबर ।। हेलिकॉप्टरमधून उतरताना उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली, ज्याच्या हातातून आजपर्यंत काही निघालं नाही, त्याच्या बॅगेत काय असणार? असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. मुंबईतील विक्रोळी येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान राज बोलत होते.
राज ठाकरे काय म्हणाले?
ज्यांच्या हातात गेली २०-३० वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता आहे, त्यांनी शहराचा विचका करुन ठेवला आहेच, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं बारीक लक्ष असायचं, नंतर बारीक लक्ष फक्त पैशावर, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यावर पहिला निशाणा साधला.
बॅगेत फार तर हातरुमाल आणि कोमट पाणी
आज आणि परवा हेलिकॉप्टरमधून उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना पण ना, काय कुठे तपासावं ते पण कळत नाही. ज्याच्या हातातून आजपर्यंत काही निघालं नाही, त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हातरुमाल आणि कोमट पाणी… काय असणार बॅगेत आणि काय तपासताय? बरं, त्या गोष्टीचं केवढं अवडंबर? आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली.. आमच्याही तपासल्या आहेत. त्यांचं काम ते करत असतात, रुटीन आहे. एवढा त्याचा काय तमाशा करायचा? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
अपॉईंटमेंट लेटर कोण खिशात घेऊन फिरतं का?
आणि त्याचा व्हिडिओ काढतात – तुझं कार्ड दाखव… तुझं अपॉईंटमेंट लेटर दाखव, अपॉईंटमेंट लेटर घेऊन कोण फिरतं का मला सांगा… २०-२५ वर्ष तुमच्यापैकी अनेक जण नोकरी करत असतील, कोण खिशात अपॉईंटमेंट लेटर घेऊन फिरतं का? काय विचारायचं ते पण माहिती नाही, कशाचा कशाशी संबंध नाही… माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्रिपदाची माळ घाला आणि बाकी गेलं तेल लावत.. अशी तोफ राज ठाकरेंनी डागली.
