हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी निष्पक्षपणेच : निवडणूक आयोग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ नोव्हेंबर ।। हेलिकॉप्टर तपासणीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असतानाच निवडणूक आयोगाने मात्र निष्पक्ष तपासणी होत असल्याचे म्हटले आहे. राजकीय नेते आणि स्टार प्रचारकांच्या हेलिकॉप्टर, विमान तपासणीत कोणताही भेदभाव केला जात नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सामानाची तपासणी होत असून त्यात अपवाद करण्यात येत नाही, असे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांच्या तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निरीक्षकांची बैठक घेतली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील सर्व केंद्रीय निरीक्षकांना निष्पक्ष राहण्याची तंबी दिली आहे. आढावा बैठकीत कुठलाही पक्षपातीपणा न दाखवता सर्व उमेदवारांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्या, त्यांना संपर्कासाठी उपलब्ध राहण्याच्या सूचना दिल्या. तक्रार अथवा समस्या मांडण्यासाठी निरीक्षक उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार उमेदवारांकडून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीदही आयुक्त कुमार यांनी दिली. राज्यात नियुक्त असलेले केंद्रीय बल आणि राज्य पोलीस दल यांनीही निष्पक्षपणे काम करत असून कुठल्याही पक्षाला झुकते माप देणार नाही, याची खबरदारी घेण्याचेही निर्देश निरीक्षकांना देण्यात आले. प्रचारादरम्यान महिलांच्या सन्मानाशी कुठेही तडजोड केली जाणार नाही, याविषयी जागरूक राहण्याविषयीही निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *