महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ४ ऑगस्ट – विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता असुन त्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविडशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे ई-लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. सर्व यंत्रणांनी मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.
कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. योग्य औषधोपचाराबरोबरच रुग्णांची योग्य कळजी आणि रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाची असुन यामध्ये हयगय अथवा दुर्लक्ष होता कामा नये. या बाबीवरही स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रीत केल्यास मृत्यूदर कमी करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही.
स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, प्रभावी उपाययोजना कराव्यात यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक यंत्रणेला औषधांचा पुरेसा साठा करुन देण्यात येईल परंतु औषधांचा वापर कसा होतो याबाबत सदैव जागरुक राहुन नियमांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा अशा सुचना श्री. ठाकरे यांनी केल्या.
सदैव दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे यासाठी प्रशासन व जनता यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. जनतेमध्ये सुरक्षित अंतर, मास्क वापरणे याबाबत जागरुकता आणण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.