महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ नोव्हेंबर ।। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगतो आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी तसे संकेत दिल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या. मात्र देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एका मुलाखतीत मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असं म्हटलं आहे.
मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही-फडणवीस
तुम्हाला वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? हे विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविकच आहे. मात्र वस्तुस्थिती पाहायची असते. आघाडी किंवा महायुतीचं राजकारण हे वास्तवावर आधारीत असतं. तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कुठलीही शर्यत नाही, मी अशा अशा कुठल्याही शर्यतीत सहभागी नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राज्याचं नेतृत्व करत होतो. त्यात महाराष्ट्रात अपयश आलं. मात्र त्यानंतरही पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली. माझ्यासाठी ही बाब पुरेशी आहे. मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी गौण बाब आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हे भाष्य केलं आहे.