राज्यात उद्यापासून तापमानाचा पारा घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ नोव्हेंबर ।। राज्याच्या बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण असून आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील चार राज्यांत होणाऱ्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणाऱ्या पावसाचा परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे. या वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी जाणवणारी थंडी नाहीशी झाली असली तरी उद्या, रविवारपासून पुन्हा थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञानी व्यक्त केला आहे.

रविवारपासून गुलाबी थंडी पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याने उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारप्रमाणे आज, शनिवारीही ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक ह्या जिल्ह्यात मात्र हा परिणाम जाणवणार नाही. या वातावरणामुळे सकाळ-संध्याकाळी जाणवणाऱ्या थंडीला रविवारपर्यंत काहीसा विराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात सध्या दुपारचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस तर पहाटेचे किमान तापमान २१ अंश सेल्सियसच्या दरम्यान असून ही दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा जवळपास दोन अंश सेल्सियसने अधिक आहेत. मुंबईसह कोकणातही ढगाळ वातावरणही निवळेल आणि रविवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीसाठीची स्थिती पूर्ववत होईल, असा अंदाज आहे. पुढील दहा दिवस म्हणजे, सोमवार २५ चक्रीवादळाची नोव्हेंबरपर्यंत कोणतीही वातावरणीय निर्मिती दोन्हीही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही थंडीसाठी अटकाव करणारा कोणताही वातावरणीय बदल दिसत नसल्याने हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.

ऊबदार कपड्यांची मागणी वाढणार थंडीची चाहूल लागताच नागरिकांकडून ऊबदार कपड्यांची मागणी वाढते. मुंबईत काही दिवस सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत होता, मात्र ढगाळ वातावरणामुळे तोदेखील नाहीसा झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातून मुंबईत येणाऱ्या या कपडे विक्रेत्यांचे प्रमाण यावर्षी अद्याप म्हणावे तितके दिसत नाही.

कमाल तापमान घसरणार दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर उद्या, रविवारपासून मुंबईत आकाश शक्यतः निरभ्र राहील आणि त्याचबरोबर कमाल तापमानातही घसरण होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कुलाबा येथे ३२.४ तर सांताक्रूझमध्ये ३३.६ कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. १७ नोव्हेंबरपासून कमाल तापमानात घसरण होऊ शकते. किमान तापमानाचा पारा हादेखील बऱ्यापैकी कमी झालेला दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *