महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ नोव्हेंबर ।। विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं. गावखेड्यांमधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब झाला. रात्री ११.४५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झालं आहे.