![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ नोव्हेंबर ।। महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातही पावसाची शक्यता होती. अशा स्थितीत आता हळूहळू तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. पाऊस गेल्यानंतर राज्यात कडाक्याची थंडी पडली असून त्यामुळे रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीची थंडी आहे. नाशिक, निफाड, धुळे या शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली आहे. यासोबतच येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. पुण्याच्या तापमानात चढ उतार दिसून येत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. याशिवाय हरियाणा, दिल्ली आणि उत्तर भारतातही कडाक्याची थंडी जाणवत आहे. महाराष्ट्रातही थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण राहिल्यानंतर आता आकाश थोडे निरभ्र दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात मोठी घसरण होत आहे. येथील तापमान 15 अंशांच्या खाली गेले आहे. दरम्यान, आज राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडीत हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुणे शहरात 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील आठवड्यात तापमानात आणखीन घट होणार आहे. गेल्या रविवारपासून पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आजपासून पुण्यासह राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता, हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
हिंद महासागर, मालदीव आणि विषुववृत्ताजवळ चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. याशिवाय, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात झपाट्याने घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. धुळ्यात 12.6 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, परभणी, गडचिरोली, गोंदिया, ब्रह्मपुरी, नागपूर, अमरावती येथे किमान तापमान 15 अंशांपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. याशिवाय उर्वरित राज्यातील किमान तापमानातही घट दिसून येत आहे.
