राज्यात सर्वाधिक मतदान ‘या’ जिल्ह्यात ; मातब्बर नेत्यांच्या दांड्या उडणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ नोव्हेंबर ।। लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूरकरांनी केलं. तीच परंपरा आता विधानसभा निवडणुकीत देखील कोल्हापूरकरांनी कायम ठेवली आहे. राज्यात सर्वाधिक सुमारे ७६.२५ टक्के मतदान करत कोल्हापूर अव्वल स्थानावर असून यात जिल्‍ह्यातील करवीर मतदारसंघ राज्यात अव्वल आला आहे. येथे ८४.७९ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत यंदा २ टक्क्याने वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांची धाकधूक ही आता चांगलीच वाढली आहे.

राज्यात गेल्या पाच वर्षात चाललेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपला कौल मतदानाद्वारे काल दिला. राज्यात एकूण ६५.११ टक्के मतदान पार पडलं असून यामध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालं आहे. जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळपासूनच पार पडलेल्या चुरशीच्या मतदानानंतर राज्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के मतदान करत कोल्हापूर जिल्ह्याने आपली परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या तीन निवडणुका पाहिल्यास मतदानाची टक्केवारी वाढतच असून २००९ मध्ये ७३.९१ टक्के, २०१४ मध्ये ७५ टक्के, २०१९ मध्ये ७४.०८ टक्के मतदान झाले होते. यंदाही वाढत्या टक्केवारीची परंपरा कायम ठेवत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला आहेच. मात्र, करवीर मतदारसंघाने ही राज्यात बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.

मातब्बर नेत्यांच्या दांड्या उडणार?
मतदार थेटपणे आपला कौल सांगत नसले तरी जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांच्या दांड्या उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शरदचंद्र पवार पक्षाच्या समरजित घाटगे यांनी तगडे आव्हान दिले. तिथे धक्कादायक निकालाची शक्यता व्यक्त होत आहे. तर कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक यांच्यात पारंपरिक लढाई होत असून येथे देखील अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. तर संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ झाल्याने नवख्या आणि साधा माजी नगरसेवक असलेल्या राजेश लाटकर यांना काँग्रेसने पुरस्कृत केले. ही लढतही चुरशीच्या वळणावर गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले शिंदे गटाचे मातब्बर नेते राजेश क्षीरसागर यांना गुलाल लावतात की सामान्य कार्यकर्त्याला खांद्यावर घेतात हे पाहणं औत्सक्याच असणार आहे या सोबतच राधानगरी, करवीर आणि शाहूवाडीत सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणूकीत शेवटच्या टप्प्यात चुरस वाढली आहे. तर हातकणंगले आणि शिरोळमध्ये तिसऱ्या आघाडीने दोन माजी आमदारांना उमेदवारी देत उभ केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच तगड आव्हान तिथे निर्माण झाला आहे.

मतदारसंघ टक्केवारी
चंदगड ७४.६१
राधानगरी ७८.२६
कागल ८१.७२
कोल्हापूर दक्षिण ६५.५१
करवीर ८४.७९
कोल्हापूर उत्तर ७४.९५
शाहूवाडी: ८९.४
हातकणंगले ७५.५०
इचलकरंजी ६८.९५
शिरोळ ७८.०६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *