महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे. या निकालापूर्वीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निकालाआधीच महाविकास आघाडीमधील पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी बैठका घेत संभाव्य विजयी उमेदवारांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत उद्या रात्री १२ पर्यंत पोहोचा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य विजयी उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. विजय झाल्यावर मिरवणुका काढा पण रात्री १२ पर्यंत मुंबईत या अशाप्रकारच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांचा कॉन्फरन्स कॉल झाला. या कॉन्फरन्स बैठकीत पक्षाकडून उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे उद्या निकालानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना पुढील सूचना देण्यासाठी मुंबईत बोलावले जाणार आहे. सत्ता स्थापनेच्या संदर्भात, फॉर्म्युला आखण्यासाठी, पुढील रणनीती ठरवण्यासाठी पक्षाकडून पुढील सूचना मुंबईत देण्यात येणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील जोरदार हालचाली सुरू आहेत.
राज्यातील काँग्रेस उमेदवारांची झूम मीटिंग झाली. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही मिटिंग घेतली. मीटिंगमध्ये नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारांना सूचना दिल्या. निकाल लागल्यानंतर तुम्हाला ठिकाण सांगितलं जाईल त्या दिशेने उमेदवारांनी यायचं आहे असे सांगण्यात आले आहे. निकालाआधीच काँग्रेसकडून मोठी खबरदारी घेतली जात आहे. कर्नाटक आणि तेलंगणातील मोठे नेतेही सर्व उमेदवारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
