शंकर जगताप यांच्या नावे पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात विक्रमी मताधिक्याची नोंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ नोव्हेंबर ।। पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघासह मावळ विधानसभा मतदारसंघातील विजेत्या उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक मते मिळण्याचा विक्रम चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार शंकर जगताप यांच्या नावे नोंदला गेला आहे. आतापर्यंतची सर्वांधिक दोन लाख 35 हजार 232 मते घेऊन त्यांनी या उच्चांकी मतांचा पल्ला गाठला आहे.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदारसंघ चिंचवड आहे. चिंचवडमध्ये तब्बल 6 लाख 63 हजार 622 मतदार आहेत. राज्यात साधारणत: सरासरी तीन लाख मतदारांचा मिळून एक मतदारसंघ असतो. यंदाच्या निवडणुकीत येथे तीन लाख 87 हजार 520 जणांनी मतदान केले. त्यानुसार, यंदा मतदानाची टक्केवारी 58.39 राहिली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात, भाजपाचे शंकर जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे यांच्यात थेट सामना झाला. पहिल्या फेरीपासून ते अखेरच्या 24 व्या फेरीपर्यंत जगताप यांनी मतांची आघाडी कायम राखली. त्यांच्या पारड्यात भरभरून मतदान होत असताना शेवटी त्यांना दोन लाख 35 हजार 232 विक्रमी मते मिळाली. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 60.51 टक्के आहे. तर, कलाटे यांना एक लाख 31 हजार 458 मते (33.8 टक्के) मिळाली आहेत.

2009 साली झालेल्या पुनर्रचनेत चिंचवड मतदारसंघाची स्थापना झाली. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप हे 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा निवडून आले. त्यांना त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत एक लाख 50 हजार 723 अशी सर्वाधिक मते मिळाली होती. तर, मार्च 2023 च्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना एक लाख 35 हजार 434 मते मिळाली होती. चिंचवड मतदारसंघाच्या आतापर्यंत झालेल्या एकूण पाच निवडणुकामध्ये, शंकर जगताप यांनी विक्रमी मते घेतली आहेत. तर, त्यांचे एक लाख 3 हजार 865 मताधिक्यही मोठे आहे.

जगताप यांच्या मतांचा हा विक्रम पुढील निवडणुकीत कोणी मोडेल, यांची शक्यता कमीच आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पुढील निवडणूक नव्या मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने मते कोणा उमेदवाराला मते घेता येणार नाहीत, हे स्पष्ट होत आहे.2026 मध्ये मतदारसंघांची होणार पुनर्रचना दोन वर्षांनंतर, अर्थात 2026 मध्ये देशातील लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार असल्याचे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

या पूर्वी 2009 मध्ये मतदार संघांची पुनर्रचना करण्यात आली होती. दर 25 वर्षांनी मतदार संघाची पुनर्रचना होणे अपेक्षित आहे. प्रत्येकी एक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असतात. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती मतदारसंख्या लक्षात घेऊन, तीनऐवजी पाच विधानसभा मतदारसंघ तयार होतील.

मावळ विधानसभा मतदारसंघ धरून पिंपरी-चिंचवडचा स्वतंत्र एक लोकसभा मतदारसंघ तयार होऊ शकतो. लोकसभा मतदारसंघ सरासरी 15 ते 18 लाखांचा असतो. तर, विधानसभा मतदारसंघ हा सरासरी 3 लाख मतदारांचा असतो. येत्या 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नव्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार होतील. त्या विधानसभा निवडणुकीत एक लाखाच्या मताधिक्याने कोणी निवडून येईल, याची शक्यता कमी आहे, असे निवडणूक विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *