महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -कोल्हापूर – ता. ६ ऑगस्ट – कोयना, धोम, कण्हेर, चांदोली या धरणांच्या परिसरात तुफानी व जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. वारणेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासांत 8 टीएमसी पाणी वाढले आहे. कृष्णेची पाणीपातळी दहा फुटांनी वाढली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणात 92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मात्र, विसर्ग कमी आहे. पंचगंगेच्या पाण्याचा दाब नृसिंहवाडीत आणि वारणेच्या पाण्याचा दाब हरिपूर येथे येत असल्याने कृष्णेचे पाणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोकरुड-रेठरे पूल पाण्याखाली ; शिराळा ः तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील सर्व मंडल क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. पूर आल्यामुळे वारणा नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वारणा नदीवरील कोकरूड ; -रेठरे पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे. चांदोली धरण 75 टक्के भरले आहे. तालुक्यात मोरणा, करमजाई, अंत्री ही धरणे पूर्ण भरली आहेत. 49 पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. मंडलनिहाय पाऊस असा : वारणावती – 140, चरण – 104, कोकरूड – 94, मांगले – 56, सागाव – 68, शिरशी – 66, शिराळा – 89.
वार्यामुळे फांद्या मोडल्या ;कोकरूड : शिराळा पश्चिम भागातील कोकरूड, बिळाशी, शेडगेवाडी, चरण, पणुंब्रे वारूण, येळापूर, गुढे पाचगणी या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे वारणेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाबरोबर सुसाट वार्यामुळे परिसरातील झाडाच्या फांद्या मोडून पडल्या आहेत.
कृष्णाकाठी महापूराची भिती ;वाळवा ः वाळवा तालुक्यात गेले तीन दिवस पडणार्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. कृष्णा नदीचे पाणी वाढू लागल्याने लोकांना महापुराची भीती वाटू लागली आहे.
चिकुर्डे बंधारा पाण्याखाली; ऐतवडे बुद्रूक : वारणा नदीकाठच्या पिकांत पाणी शिरले आहे. चिकुर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या ऊस व खरीप पिकांत पाणी साचले आहे.
विद्युत पंप बुडाले; सावंतपूर : पलूस तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येरळा नदी प्रवाहित झाली आहे. कृष्णा नदीचे पाणी गतीने वाढल्याने अनेकांचे विद्युत पंप बुडाले आहेत. कडेगाव तालुक्यातही जोरदार पाऊस पडला.
पिके भुईसपाट; मांजर्डे : तासगाव तालुक्याच्या बहुतांश भागात दिवसभर जोरदार पाऊस पडला. तासगाव शहर, गव्हाण, मणेराजुरी, आरवडे, डोर्ली, कौलगे, खुजगाव, वायफळे, कौलगे, लोढे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिके पिवळी पडली आहेत. ज्वारी, मका, ऊस यासह अन्य पिके वार्यामुळे भुईसपाट झाली आहेत.
आरग तलाव पाणीसाठ्यात वाढ; आरग/कवठेपिरान : मिरज पश्चिम व पूर्व भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. डिग्रज, दुधगाव, कवठेपिरान, बुधगाव, बिसूर, कर्नाळ, आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी परिसरातील शेततळी, ओढे, नाल्यातून पाणी साचले आहे. आरग येथील मुख्य पाझर तलावामध्ये पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे.
म्हैसाळ परिसरात पावसाला जोर; म्हैसाळ : म्हैसाळ परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने येथील कृष्णा नदीचे पाणी वाढत आहे. म्हैसाळ बंधारा भरत आला आहे. म्हैसाळ, कागवाड, नरवाड या भागातील शेतकर्यांना पावसाने दिलासा मिळाला आहे.
माळरानं पाझरली; कवठेमहांकाळ/विटा/ जत / आटपाडी : कवठेमहांकाळ तालुक्यात बुधवारी दिवसभर संततधार सुरू होती. अनेक गावांत ओढ्यांना पाणी आले. भिज स्वरूपाच्या पावसामुळे माळरानांना पाझर फुटण्यास मदत होणार आहे. खानापूर तालुक्यात मध्यम पाऊस झाला. आटपाडी, जत तालुक्यातही दिवसभर पाऊस पडला. या पावसाचा खरीपाच्या पिकांना चांगलाच उपयोग होणार आहे.