महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ६ ऑगस्ट – लॉकडाऊन काळात सिनेमा-सीरियल्सचे शूटिंग बंद होते. त्यामुळे प्रेक्षकांना रिपीट मालिका पाहाव्या लागत होत्या. दरम्यान देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ देखील लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आली आहे. नवीन एपिसोड्स सुरू झाल्यानंतर प्रेक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे. ही मालिका केवळ टेलिव्हिजन जगतातच नाही तर सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. यातील कलाकारांनी प्रत्येकाची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील अव्वल स्थानावर आहे. दरम्यान हा शो सुरू झाल्याच्या आनंदात असणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. यातील दयाबेन अर्थात दिशा वकानी मालिकेमध्ये पुन्हा परतण्याची शक्यता आहे.
येणाऱ्या काही दिवसात तारक मेहताच्या काही एपिसोडमध्ये रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे. यातील स्पेशल एपिसोडसाठी दिशा वकानीची एंट्री केली जाऊ शकते. याबाबत मालिकेच्या मेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. मात्र सोशल मीडियावर ‘दयाबेन’ परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.