महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ नोव्हेंबर ।। अवघ्या राज्याला हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी अहिल्यानगरमध्ये हंगामातील सर्वात नीचांकी 9.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिक व पुणे 10.8, जळगाव 11 अंशांच्या खाली आले होते.
उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी सक्रिय झाल्या आहेत, तर बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर या दोन्ही वार्यांच्या प्रभावामुळे दाट धुके अन् थंडी असे वातावरण तयार झाले आहे. मंगळवारी संपूर्ण राज्य गारठण्यास सुरुवात झाली. बहुतांश भागांचा पारा 9 ते 12 अंशांपर्यंत खाली येण्यास सुरुवात झाली.
मंगळवारचे राज्याचे किमान तापमान
नगर 9.7, पुणे 10.8, नाशिक 10.8, जळगाव 11, महाबळेश्वर 12.6, सातारा 12.9, छत्रपती संभाजीनगर 12.1, परभणी 12, कोल्हापूर 15.7, मालेगाव 13, सांगली 15.3, मुंबई 22.5, रत्नागिरी 19.6, सोलापूर 15.5, धाराशिव 16, अकोला 13.4, अमरावती 14.9, बुलडाणा 13.4, ब्रह्मपुरी 12, चंद्रपूर 13.5, गोंदिया 12.2, नागपूर 12, वर्धा 13.4.
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले. बुधवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याने राज्यात थंडी अन् दाट धुके, असे वातावरण राहणार आहे. या वादळाला ’फेंगल’ हे नाव सौदी अरबने दिले असून, त्याचा अर्थ आक्रमक असा होतो. हिंदी महासागरात यंदाच्या वर्षभरातील हे तिसरे चक्रीवादळ आहे.