शरद पवारांच्या ‘या’ उमेदवाराचा अवघ्या 377 मतांनी पराभव, पण आता अनोख्या बॅनरची का होतेय चर्चा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ नोव्हेंबर ।। विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाला आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे. त्यामुळे मविआ आणि पराभूत उमेदवारांमध्ये नाराजी आहे. चिन्ह साधर्म्य आणि सारख्या नावांमुळे अनेक उमेदवारांना निवडणुकीत फटका बसला असल्याचे समोर आले आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक अवघ्या 377 मतांनी पराभूत झाले मात्र त्यांच्या अनोख्या बॅनरची आता चर्चा होतेय.

संदीप नाईक यांचे अनोखे बॅनर नवी मुंबईत लागले आहे. या बॅनरमध्ये हा तांत्रिक पराभव असल्याचे म्हटले आहे, जनतेच्या मनातील खरा आमदार संदीप नाईकच आहे, या बॅनरमवर डमी उमेदवार आणि प्रतिकात्मक चिन्हास जास्त मते मिळाल्याचे दाखवून दिले आहे.

मतविभाजन
जनतेच्या मनात बेलापूरचे आमदार हे फक्त संदीप नाईकच आहे, अशी चर्चा रंगली आहे. पिपाणी सारखे चिन्ह व संदीप नाईक यांच्या नावाचा डमी उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा केला गेला होता. त्यामुळे संदीप नाईक यांना मिळालेली काही मते विभागली गेली. त्यांचा 377 मतांनी पराभव झाला. मात्र हा पराभव नसून महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांचा विजय आहे. जनतेच्या मनात तेच आमदार आहे, असे बॅनर नवी मुंबईत झळकले आहेत.

संदीप नाईक यांना 91,475 मते मिळाली आहेत. डमी उमेदवारास 513 मते मिळाली आहे. पिपाणी चिन्हासारखे दिसणाऱ्या ट्रम्पेट चिन्हाला 2860 मते मिळाली आहे. या सर्वांची बेरीज केली तर 94,830 मते होतात. ती मते विजयी उमेदवारापेक्षा जास्त आहे, असा दावा बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विजय वाळूंज यांनी केला आहे. हे बॅनर नवी मुंबईतील अनेक ठिकाणी लागल्याने चर्चा रंगली आहे.

बेलापूरमध्ये भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होती. यामध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी विजय मिळवला. अटतीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रे यांचा ३७७ मतांनी विजय झाला. अपक्ष असणाऱ्या प्रफुल्ल म्हात्रे यांना 2860 मते मिळाली. त्याचं चिन्ह तुतारीसारखेच दिसणारे ट्रम्पेट चिन्ह होतं. त्याशिवाय अपक्ष असणारे संदीप नाईक यांना 512 मते मिळाली आहेत. ट्रम्पेट चिन्ह आणि नाम साधर्म असलेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे संदीप नाईक यांचा पराभव झाल्याची चर्चा बेलापूरमध्ये होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *