मयंकची दहशत; सलग दुसऱ्या सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ एप्रिल ।। प्रथमच आयपीएल खेळत असलेल्या आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यांत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवणाऱ्या अतिशय वेगवान मयंक यादवने सनसनाटी तर निर्माण केलीच आहे. मंगळवारी झालेल्या बंगळूरविरुद्धच्या सामन्यात त्याचा एक चेंडू ताशी १५६.७ किमी इतक्या भन्नाट वेगात होता.

यष्टीरक्षण करत असताना त्याचा एक चेंडू ग्लोजमधून आपल्या हाताला लागल्याची कबुली यष्टीरक्षक केएल राहुल याने दिली. यंदाच्या आयपीएलला जोमात सुरुवात झाली आहे; पण सध्या एका खेळाडूचीच सर्वाधिक चर्चा आहे ती मयंक यादवची. प्रत्येक चेंडू ताशी १५० किमीपेक्षा अधिक वेगात टाकण्याची क्षमता असलेला वेगवान गोलंदाज भारतीय क्रिकेटला मिळाला असल्यामुळे बीसीसीआय आणि निवड समिती त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

२०२२ मधील आयपीएलमध्ये काश्मीरच्या परंतु हैदराबाद संघातून खेळणाऱ्या उमरान मलिक यानेही एक चेंडू सर्वाधिक वेगात टाकला होता. तेव्हापासून त्याच्याही नावाची चर्चा होती; परंतु मयंककडे असलेली अचूकता भेदकता वाढवत आहे.

बंगळूरविरुद्ध मंगळावारी झालेल्या सामन्यात मयंकने ऑस्ट्रेलियाच्या मातब्बर ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन यांना आपल्या तुफानी वेगवान चेंडूवर बाद केले. दिल्लीच्या सोनेट क्लबमधून तयार झालेल्या मयंकने ग्रीनची उजवी यष्टी उखडून टाकताना टाकलेला चेंडू ताशी १५६.७ किमी वेगाचा होता.

मयंकच्या या वेगवान माऱ्याचा सामना करताना बंगळूर संघातील फलंदाजांची त्रेधातिरपीट उडत होती; परंतु यष्टीरक्षण करणारा कर्णधार केएल राहुललाही सावधपणे यष्टीरक्षण करावे लागत होते. त्याच्या एक चेंडू मला ग्लोजमधूनही लागला, असे त्याने सांगितले.

दोन मोसमापासून तो खेळण्याची संधी मिळण्यासाठी वाट पाहत होता. गतवर्षी दुखापतीमुळे मयंकला खेळता आले नव्हते, अशी माहिती राहुलने सामन्यानंतर दिली. सातत्याने ताशी १५५ किमी वेगात चेंडू टाकणे सोपे नाही, यष्टीच्या मागे उभे राहून त्याचा वेगवान मारा पाहणे आनंददायी आहे, असे राहुलने सांगितले.

मयंकची वर्ल्डकपमध्ये निवड अपेक्षित : रबाडा
आफ्रिकेचा भेदक वेगवान गोलंदाज असलेल्या कागिसो रबाडानेही मयंक यादवचे कौतुक केले. येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत त्याची निवड अपेक्षित असल्याचे रबाडाने सांगितले.

मयंकचा तुफानी वेगवान मारा गेल्या आठवड्यात पंजाब संघातून खेळणाऱ्या रबाडाने जवळून अनुभवला. मयंककडे दहशत निर्माण करणारा वेग तर आहेच; पण त्याच्याकडे असलेली अचूकता त्याचे चेंडू धोकादायक ठरत आहेत. अशी गुणवत्ता उपजतच असते, असे रबाडा म्हणाला.

आयपीएलमधील सर्वाधिक वेगवान
शॉन टेट (देश : ऑस्ट्रेलिया) : १५७.७

लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) : १५७.३

जेरार्ड कोएत्झी (द. आफ्रिका) : १५७.४

उमरान मलिक (भारत) : १५७

मयंक यादव (भारत) : १५६.७

यंदाच्या स्पर्धेतील आत्तापर्यंतचे वेगवान चेंडू
मयंक यादव (संघ : लखनौ) : १५६.७

नांद्रे बर्गर (संघ : राजस्थान) : १५३

जेराल्ड कोएत्झी (संघ : मुंबई) : १५२.३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *