महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१ डिसेंबर ।। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरल्यानंतर महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक अटींसह २१ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात आहे. निवडणूक काळात आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात आली होती. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणुकीचा निकालही लागला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठा लाभ झाला असून जनतेने महायुतीच्या पदरात बहुमतांचं दान टाकलं आहे. त्याचबरोबर आचारसंहिता देखील उठवली आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा आहे.
महायुती सरकारने निवडणूक काळात घोषणा केली होती की महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्यांचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपयांचा हप्ता दिला जाईल. दुसऱ्या बाजूला दबक्या आवाजात चर्चा होती की निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होईल किंवा या योजनेचे निकष बदलले जातील. सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. त्यातच नोव्हेंबर महिना संपला असून अजून या महिन्याचा योजनेचा हप्ता महिलांना वितरीत केलेला नाही. त्यामुळे महिलांसह राज्यातील जनतेच्या मनात या योजनेबाबत संभ्रम आहे.
दरम्यान, राज्यातील काळजीवाहू सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेबाबत भाष्य केलं आहे. तसेच महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत.
लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार काय म्हणाले?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक बाबा आढाव हे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत होते. देशातील लोकशाही टिकावी, संविधानाचं रक्षण व्हावं या मागणीसह महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा, ईव्हीएमचा दुरुपयोग झाल्याचा संशय व्यक्त करत बाबा आढाव उपोषणाला बसले होते. काल (शनिवार, ३० नोव्हेंबर) त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. काल काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली व त्यांच्यासमोर सरकारची बाजू मांडली. तसेच त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबतही प्रश्न विचारण्यात आले. अजित पवारांना विचारण्यात आलं की, लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहेत का? किंवा ते बदलले जाणार आहेत का? यावर अजित पवार म्हणाले, “अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ”.