महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ डिसेंबर ।। जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचे चलन असलेल्या ‘डॉलर’ला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास शंभर टक्के करांचा सामना करावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ब्रिक्स’ गटाला दिला आहे. तसेच, असे प्रयत्न होणार नाही अशी हमी देण्याचे आवाहनही ट्रम्प यांनी केले आहे.
भारत, चीन आणि रशियासह सध्या एकूण नऊ देशांचा गट असलेल्या ‘ब्रिक्स’ची स्थापना २००९ मध्ये झाली आहे. सदस्य म्हणून अमेरिकेचा समावेश नसलेला हाच एकमेव प्रभावशाली गट आहे. ब्रिक्स सदस्यांनी जागतिक व्यवहार करताना डॉलरपेक्षा वेगळ्या चलनाचा वापर करावा किंवा ब्रिक्स गटाचे नवे चलन निर्माण करावे, अशी मागणी मागील काही वर्षांपासून चीन आणि रशिया करत आहेत. भारताने अद्याप अशी मागणी केलेली नाही. या मागणीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.
स्वत:ची मालकी असलेल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रम्प यांनी भूमिका मांडली आहे. ट्रम्प म्हणाले,‘‘डॉलरचा वापर टाळण्याचा विचार ब्रिक्स देश करत आहेत आणि आम्ही शांतपणे ते पाहात आहोत, हे चित्र आता दिसणार नाही. ब्रिक्स चलन निर्माण करणार नाही किंवा डॉलरशिवाय इतर चलनांचा वापरही करणार नाही, अशी ब्रिक्सकडून हमी आम्हाला हवी आहे. त्यांनी असे केले नाही तर आयात-निर्यातीवर शंभर टक्के कर लागू करू. तसेच, अमेरिकी बाजारपेठही या देशांना मुकावी लागू शकते.’’
भारताचा विरोध
डॉलरला पर्यायी चलन निर्माण करण्यास भारताचा पाठिंबा नसल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. ‘‘पूर्वी आम्ही पर्यायी चलनाचा विचार करत होतो. आता ती परिस्थिती नाही. आम्ही कधीही डॉलरला लक्ष्य केलेले नाही. हा आमच्या आर्थिक धोरणाचा किंवा राजकीय व्यूहाचाही भाग नाही. कदाचित इतरांच्या मनात तसे असेल,’’ असे जयशंकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते.