महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ डिसेंबर ।। चिंचवड स्टेशन येथे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणार्या रेल्वे मार्गावरील पूल नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.3) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली आहे.
पिंपरीतील इंदिरा गांधी आणि ‘चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील पूल पाडा, रेल्वे विभागाचे महापालिकेस पत्र’ असे बातमी ‘पुढारी’ने 29 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली होती. आयुक्तांच्या वरील निर्णयामुळे या बातमीस पुष्टी मिळाली आहे. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
चिंचवड स्टेशन येथील रेल्वे मार्गावर पुणे-मुंबई जुन्या महामार्गाववरून प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने वाहतुकीसाठी दोन समांतर पुल आहेत. चिंचवड स्टेशनवरुन चिंचवड गावाकडे जाणारे डाव्या बाजूकडील पुलाचे आयुर्मान संपले आहे. त्या पुलास 47 वर्षे झाले आहेत. तो पुल दुरुस्त न करता पाडा, असे पत्र मुंबईच्या भारतीय रेल्वे विभागाने महापालिकेस पाठविले आहे.
त्या पुलाचे मॅप्स ग्लोबल सिव्हील टेक प्रा. लि.कडून स्ट्रॅक्टचर ऑडिट करून घेण्यात आले. तसेच, पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगकडून ऑडिट अहवालाची छाननी करून घेण्यात आले.
त्यांच्या अहवालानुसार जुन्या पुलावर अवजड वाहनांना 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रवेशबंदी करण्यात आली. तेथे हाईट सिस्ट्रीक्शनची कमान उभारण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जुना पुल पाडून नव्याने पूल उभारण्याबाबत महापालिकेला रेल्वे विभागाने सूचित केले आहे.
त्यानुसार, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जुना पूल पाडून नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. पुलासाठी 80 कोटींची प्रशासकीय मान्यता असून, सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पुलाच्या कामासाठी मॅप्स ग्लोबल सिव्हील टेक प्रा.लि.ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.