महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ डिसेंबर ।। पंजाबमधीलअमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल हे अगदी थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून या गोळीबाराच्या घटनेनंतर उपस्थित लोकांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र हा गोळीबार का करण्यात आला याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
हल्लेखोराला ताब्यात घेतलं
या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा सेवादरांचा पेशाख घातलेले बादल त्यांच्या व्हील चेअरवर बसललेले दिसत आहेत. सोमवारी (२ डिसेंबर) बादल यांना ‘अकाल तख्त’कडून धार्मिक शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे पाय फ्रॅक्चर असलले बादल हे व्हील चेअरवर बसून सुवर्ण मंदिराबाहेर सेवा देत होते. दरम्यान या घटनेबद्दल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव नारायण सिंग चौरा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
#WATCH | Punjab: Bullets fired at Golden Temple in Amritsar where SAD leaders, including party chief Sukhbir Singh Badal, were offering 'seva'. The attacker, identified as Narayan Singh Chaura by the Police has been overpowered by the people and caught.
(Video Source: PTC News) pic.twitter.com/b0vscrxIL8
— ANI (@ANI) December 4, 2024
बादल यांना शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा
पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी सोमवारी बादल आणि इतर वरिष्ठ नेत्यांना ‘तनखा’ (धार्मिक शिक्षा) ठोठावली. या शिक्षेचा एक भाग म्हणून, बादल आणि २०१५ पासून राज्यातील मंत्र्यांसह अकाली दलाच्या ‘कोअर कमिटी’ सदस्यांना शौचालये स्वच्छ करणे, लंगरमध्ये सेवा करणे, नितनेम (दररोज शीख प्रार्थना) करणे आणि सुखमनी साहिबचे पठण करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आरोग्याच्या तक्रारींमुळे सुखबीर बादल आणि सुखदेव सिंग धिंडसा यांना गुरूंच्या निवासस्थानी दोन दिवस द्वारपाल म्हणून काम करण्यास, पारंपरिक सेवक पोशाख घालून भाले धारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बादल हे तेव्हापासून सेवादार म्हणून सुवर्णमंदिरात सेवा देत आहेत.