CM Devendra Fadnavis : ‘ देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ’; तिसऱ्यांदा करणार राज्याचे नेतृत्व; आज घेणार शपथ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर ।। राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या भाजपच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्याच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. गुरुवारी (ता.५) ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भाजपकडून महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

फडणवीस हे वयाच्या ४४ व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले होते. तसेच, ते सर्वांत तरुण महापौरही होते. फडणवीस हे १९९७ मध्ये २९ व्या वर्षी नागपूरचे महापौर झाले होते. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस नागपूरचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांची आई सरिता फडणवीस विदर्भ गृहनिर्माण पत महामंडळाच्या माजी संचालिका होत्या.

इंदिरा गांधींच्या नावाच्या शाळेतून बाहेर
फडणवीस यांचे शालेय शिक्षण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये झाले. आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्या वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

ज्यांच्यामुळे वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला, त्यांचे नाव असलेल्या शाळेतून आपले शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास फडणवीस सहमत नव्हते. त्यानंतर त्यांनी सरस्वती विद्यालय आणि नंतर धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी एकात्मिक कायद्याची पदवी घेतली आहे.

चढता आलेख

भाजपशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सक्रिय सदस्य

महापालिकेची पहिली निवडणूक रामनगर प्रभागातून जिंकली

नागपूर महानगरपालिकेचे १९९७ मध्ये सर्वांत तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वांत तरुण महापौर बनले

भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षपदी २०१३ मध्ये निवड

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतर विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रिपदी विराजमान

२०१४ ते २०१९ असा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री

२०२१ मधील बंडखोरीनंतर

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात शिवसेनेत बंडखोरी

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी भाजपचा हात धरला

शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत

यंदाची म्हणजे २०२४मधील निवडणूक भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वात लढली

अतिशय सूक्ष्म नियोजन करीत त्यांनी राज्यभर दौरे केले

आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक १३२ आमदार निवडून आणले

फडणवीस यांच्या नेतृत्वावर सर्व सदस्यांनी विश्वास दाखवत भाजपचे विधिमंडळ नेतेपदी निवड केली. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार

भूषवलेली पदे

१९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष

१९९९ ते आजतागायत – विधानसभा सदस्य

१९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर

१९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष

२००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

२०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस

२०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष

२०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

२०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते

जून २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री

विधिमंडळातील कार्य

१९९९ पासून ते आतापर्यंत विधिमंडळात आमदार

अंदाज समितीचे सदस्य

नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य

नियम समितीचे सदस्य

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य

राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य

सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य

स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त निवड समितीचे सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *