Eknath Shinde: शिंदे अखेर सत्तेत, हि कारणं महत्त्वाची ; शिंदेंनी संभाव्य धोका टाळला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर ।। पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न होणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शिंदेंच्या शपथविधीबद्दल निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला. शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास राहिलेले असताना शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आमदारांकडून गेल्या ३ दिवसांपासून शिंदेंची मनधरणी सुरु होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर आज यश आलं. शिंदेंनी उपमुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शवण्यामागे तीन महत्त्वाची कारणं आहेत.

शिवसेनेत अंतर्गत संघर्षाची शक्यता
शिंदेंनी स्वत: उपमुख्यमंत्री न होता अन्य कोणत्या नेत्याकडे या पदाची जबाबदारी दिली असती, तर मग अन्य नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा जागृत झाल्या असत्या. शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होतं. याशिवाय शंभुराज देसाई, उदय सामंत यांचीही नावं चर्चेत राहिली. श्रीकांत यांची निवड केली असती, तर घराणेशाहीची टीका झाली असती. कारण ते आधीच लोकसभेचे खासदार आहेत. अन्य एखाद्या नेत्याकडे जबाबदारी सोपवली असती, तर अन्य नेते नाराज होण्याची शक्यता होती.

पक्षात आणखी एक सत्ताकेंद्र
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड केलं. त्यांना ४० आमदारांनी साथ दिली. त्या बंडानं ते पक्षाचे निर्विवाद नेते झाले. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी पक्षावरील पकड आणखी मजबूत केली. सध्या तरी त्यांच्या तोडीचा नेता पक्षात नाही. पण अन्य कोणाकडे उपमुख्यमंत्रिपद दिलं असतं, तर मग पक्षात आणखी एक सत्ताकेंद्र तयार झालं असतं. त्यामुळे शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता होती.

महायुतीत ताळमेळ; फडणवीस, पवारांशी समन्वय
भाजप, शिवसेनेत समन्वय राखण्याचं महत्त्वाचं काम शिंदे पार पडतात. त्यामुळे महायुती सरकार कोणत्याही मोठी वादाशिवाय काम करत आलं आहे. अजित पवार महायुतीत आल्यावर शिवसेनेच्या काही मंत्री, आमदारांनी खळखळ केली. पण शिंदेंनी तसं केलं नाही. शिंदे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांशी उत्तम संबंध आहेत. शिंदे सरकारमध्ये असल्यास ताळमेळ चांगला राहू शकतो. ते सत्तेत नसल्यास समन्वय बिघडू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *