महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। Health Tips For Eyes: आजच्या डिजिटल युगात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपला बराचसा वेळ स्क्रीनसमोर घालवतो. लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर डिजिटल उपकरणांचा अतिवापर केल्याने डोळ्यांना ताण येतो. परिणामी, डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा, आणि खाज निर्माण होते. सततच्या स्क्रीन टाइममुळे दृष्टी दुर्बळ होण्याचा धोका वाढतो. यासाठी, डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खालील दिलेल्या टिप्सचा नक्की वापर करा.
२०-२०-२० नियम पाळा
आजकाल आगदी छोट्या छोट्या कामांसाठी आपण डिजिटल उपकरणे वापरतो. डिजिटल उपकरणांसमोर काम करताना डोळ्यांवर ताण येतो. यासाठी दर २० मिनिटांनी २० फूट अंतरावरील वस्तूकडे २० सेकंद बघा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि डोळ्यांचा ताण कमी होतो.
डोळ्यांचे व्यायाम करा
डोळ्यांची ताकद वाढवण्यासाठी सोपे व्यायाम करा. डोळे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व उलट फिरवा. याशिवाय, जवळच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा, नंतर दूरच्या वस्तूकडे पाहा. हे व्यायाम डोळ्यांच्या स्नायूंना बळकटी देतात.
डोळ्यांसाठी पोषक आहार घ्या
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात गाजर, पालक, गोड बटाटे यांसारखे व्हिटॅमिन ए समृद्ध पदार्थ समाविष्ट करा. ओमेगा-३ फॅटी अॅसिड्ससाठी मासे, अक्रोड, व जवस खा. हिरव्या पालेभाज्यांमधील लुटिन आणि झेक्झँथिन दृष्टीसाठी फायदेशीर ठरतात.
हायड्रेटेड राहा
डोळ्यांतील कोरडेपणा दूर करण्यासाठी पुरेसे पाणी प्या. तसेच डोळे ओलसर राहणे आवश्यक असते, त्यासाठी डोळ्यांची नियमित उघड-झाप करा.
स्क्रीन टाइम कमी करा
स्क्रीनसमोर घालवलेला वेळ कमी करा किंवा ब्लू लाइट ब्लॉकींग चष्म्याचा वापर करा. स्क्रीन योग्य उंचीवर ठेवा आणि डोळ्यांपासून २०-२५ इंच अंतरावर ठेवा.
डोळे संरक्षित ठेवा
कडक उन्हात बाहेर पडताना तसेच यूव्ही किरणांपासून डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सनग्लासेसचा वापर करा. धोका असलेल्या कामांमध्ये संरक्षणात्मक चष्म्याचा वापर न चूकता करा.
डोळ्यांची नियमित तपासणी करा
दरवर्षी डोळ्यांची तपासणी करा. डोळ्यांच्या आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर लगेच उपचार मिळवा.
डोळ्यांसाठी आरामदायक तंत्रे वापरा
पामिंग पद्धती वापरून डोळ्यांना आराम द्या. त्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर हात चोळून गरम करा आणि मग डोळे बंद करून हात हलक्या दाबाने डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते.
पुरेशी झोप घ्या
पुरेशी झोप मिळाल्यास डोळ्यांना विश्रांती मिळते आणि थकवा दूर होतो, यामुळे दृष्टी सुधारते. त्यामुळे गरजेची असलेली ७-८ तासांची पूर्ण झोप घ्या.
टीप: डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतील. मात्र, काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डिजिटल युगातही डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.