महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। लाडकी बहीण योजनेला पिंपरी चिंचवड या शहरातून या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, याच शहरातील अर्ज छाननी प्रक्रियेत अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल ४ लाख ३२ हजार ८९० तरूणी व महिलांनी अर्ज भरले. महापालिकेचे केंद्र, अंगणवाडी सेविका, ऑनलाईन अशा माध्यमातून महिलांनी अर्ज भरले. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ३ लाख ८९ हजार ९२० अर्ज वैध ठरले. वैध ठरलेल्या अर्जांच्या बँक खात्यात पाच हफ्ते जमा झाले. तर, ४२ हजार ४८६ अर्ज बाद करण्यात आले आहेत.
कोणत्या परिसरातील अर्ज बाद?
रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सर्वाधिक ६५ हजार ८७१ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पांजरपोळ, भोसरी या ई क्षेत्रीय कार्यालयात ६३ हजार १०६ आणि थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात ६० हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर, निगडी येथील फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्वांधिक १० हजार ८२९ अर्ज बाद करण्यात आले. तर, ड क्षेत्रीय कार्यालय ह्द्दीतील ७ हजार ६२ अर्ज बाद झाले आहेत. अर्जांची छाननी प्रक्रिया, निकषात बसत नसलेले अर्ज अवैध ठरत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
लाभ कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लाडक्या बहिणींना लाभ मिळणे बंद केले आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांना लाभ मिळालेले नाही. फक्त सप्टेंबर २०२४ पर्यंतचा लाभ महिलांना मिळाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार का? तो कधी मिळणार? बँक खात्यात नेमक्या कोणत्या तारखेला रक्कम जमा होणार? असे अनेक प्रश्न महिलावर्गामध्ये उपस्थित होत आहे.