महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर ।। देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या भव्य शपथविधी सोहळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच चार डिसेंबर रोजी फडणवीसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी ‘जुन्या मित्रां’मध्ये गप्पा झाल्या. ठाकरेंनी आपल्याला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले.
विरोधातील ज्येष्ठांना फोन
नियमांनुसार विरोधी पक्षालाही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी बोलवावे लागते. या अनुषंगाने आपण ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले, “मी शरद पवार यांना फोन केला होता. मात्र संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने आपण येऊ शकणार नाही, असं ते म्हणाले, पण त्यांनी मला मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंसोबत काय बोलणं झालं?
फडणवीस पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. आमची चांगली चर्चा झाली. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि माझ्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या” अशी माहिती फडणवीसांनी दिली. विरोधी पक्षांचे नेते माझ्या शपथविधीला आले असते, तर मला अधिक आनंद झाला असता. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या शपथविधीलाही आपण गेलो होतो, अशी आठवण फडणवीसांनी करुन दिली. राजकारणातील कटुतेमुळे विरोधक आले नाहीत का? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, मला तसं वाटत नाही. पण कधी लोक येतात, कधी येत नाहीत, असं म्हणत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.
ठाकरेंनी विश्वासघात केला पण…
मी विरोधकांना त्यांच्या संख्येच्या आधारावरुन डिवचणार नाही. मी त्यांच्या समस्या देखील ऐकून घेईन, असे फडणवीसांनी मुलाखतीत सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली पाच वर्षे आव्हानांनी भरलेली होती. २०१९ मध्ये जनादेश मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. आम्ही अडीच वर्ष लढलो आणि त्या काळात आमचे सर्व मित्रपक्ष आमच्यासोबत होते. मी कोणत्याही पोस्टिंगसाठी कधीही पैसे घेतले नाहीत आणि माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत, असं फडणवीस म्हणाले.