महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर ।। महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता झाली. यावेळी उपस्थितांनी भंडारा उधळीत “यळ कोट यळ कोट जय मल्हार”चा गजर केला. वांग्याचे भरीत बाजरीचा रोडगा,कांद्याची पात, पुरण पोळीचा नैवद्य खंडोबाला दाखविण्यात आला होता.
तत्पूर्वी शुक्रवारी (दि.6) मार्गशीर्ष पंचमीला पारंपरिक पध्दतीने वाजतगाजत सायंकाळी गडावरून तेलहंडा मिरवणूक काढून मानकरी व भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने श्रीखंडोबा व म्हाळसादेवीला तेलवण करून हळद लावण्यात आली आहे.
मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन उपासनेला सुरुवात झाली होती. मार्गशीर्ष पंचमीला देवाला तेलवण व हळद लावली जाते. त्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जेजुरी गडावरून गुरव, कोळी, वीर, घडशी या पुजारी, सेवकवर्गाच्या वतीने पारंपरिक पध्दतीने तेलहंडा काढण्यात आला. मंदिरासमोर या तेलहंड्याचे पूजन करून आरती करण्यात आली. कोळी समाजाचे कैलास लांघी यांनी तेलहंडा डोक्यावर घेऊन घडशी समाजाच्या वतीने सनई-चौघडा वाजवत मिरवणूक काढण्यात आली.
मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सवमूर्तीची घटस्थापना करवीर पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते करण्यात आली होती. आज सकाळी उत्सव मूर्तींवर दुग्ध अभिषेक करून उत्सव मूर्ती मंदिरात नेवून देवाचे घट उठविण्यात आले.
तीन हजार किलो वांग्याचे भरीत
जेजुरी देवसंस्थान व जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे तीन हजार किलो वांग्याचे भरीत,हजारो भाकरी, तसेच पुरण पोळी व मिष्टान्नचा प्रसाद हजारो भाविकांना देण्यात येणार आहे. पहाटे पासून मानकरी, ग्रामस्थांच्या पूजा अभिषेक जेजुरी गडावर सुरू होत्या. हजारो भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी केली होती.