महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.९ डिसेंबर ।। पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशी आणि गाड्यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे या स्थानकाचे विकास होणे महत्त्वाचे आहे. पुणे रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून दररोज २००च्या आसपास गाड्या धावतात, तर दीड लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.
या ठिकाणी सहा फलाट आहेत. पण त्यांची लांबी कमी असल्यामुळे २४ डब्यांच्या ट्रेन येथून सोडता येत नाहीत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनचे यार्ड रिमॉडलिंगचा प्रस्ताव अनेक वर्षे धूळखात पडून आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणच्या कामाला २०१६-१७ मध्येच मंजुरी मिळाली आहे. मात्र, ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
आता पुणे रेल्वे विभागाकडून पुणे रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणच्या कामाबरोबरच प्लॅटफॉर्म वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा आराखडा नुकताच रेल्वेने पूर्ण केला आहे. आता त्याला अंतिम मंजूरी देऊन त्याची निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या वर्षात पुणे रेल्वे स्थानकाची सर्व कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
– २४ डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म
– १८ ते २० डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म
– मालधक्काच्या बाजूने मुंबईच्या दिशेने आणखी दोन नवे प्लॅटफॉर्म
– एक प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल
– पुणे रेल्वे स्टेशन येथे दोन स्वतंत्र मुख्य लाइन