महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.९ डिसेंबर ।। आज बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चार नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे, सुनील मोदी या नेत्यांना दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
या चार शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्था संदर्भात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने बेळगाव प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पण हे नेते बेळगावला जाण्यावर ठाम आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि बेळगाव येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
आजपासून कर्नाटक राज्य सरकारचं बेळगाव इथं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारने बेळगाव इथे जय्यत तयारी केलेली आहे. तसेच बेळगाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे. तर सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव इथं महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला महाराष्ट्रातून नेते येऊ नयेत यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील नेत्यांवर बेळगाव जिल्ह्यात बंदी घातलेली आहे.
आज सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेने महा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रवाना होणार आहेत. सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील ताराराणी चौक परिसरातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीवर अर्थात कोगनोळी नाका इथं कर्नाटक पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सकाळी या परिसरातून कोणतेही कार्यकर्ते बेळगावच्या हद्दीत घुसू नयेत यासाठी त्यांची धरपकड ही होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.