मदतीशिवाय शाळेचा कायापालटची तयारी: माजी विद्यार्थी उभारणार क्रीडासंकुल व आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २४ डिसेंबर २०२५ | स्पर्धात्मक युगातील सध्याची विद्यार्थ्यांची पिढी ही अभ्यासाने अत्यंत हुशार समजदार कोणतेही काम अत्यंत चाणाक्षपणे, लवकरात लवकर प्रभावीपणे शिकून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नावलौकिक वाढवणारी आहे ही जरी जमेची बाजू असली तरी सध्याच्या पिढीवर मोबाईल कॉम्प्युटर वेगवेगळे चॅनल व सोशल मीडिया यांचा भडिमार होऊन त्यांचे कौशल्य याच एका गोष्टीमुळे कमी होत असल्याचे किंवा त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रामुख्याने जाणवते यावेळी या समस्ये वैतागलेला प्रत्येक पालक आपल्या पाल्याकडून थोड्याफार प्रमाणात अपयशी होताना दिसतो याचे कारण म्हणजे पूर्वी ज्याप्रमाणे विद्यार्थी आपल्या शालेय अभ्यास सांभाळून मैदानी खेळ किंवा त्यांच्या कलेला जोपासना होईल अशा प्रकारे वेळ देऊन त्यांचा अभ्यासासोबतच शारीरिक विकास देखील होत असे.

मोबाईल व कॉम्प्युटर यासारख्या गॅझेटच्या माध्यमातून एखाद्या व्यसनासारख्या भरकटवणाऱ्या भयंकर अशा संकटापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवावे या एका छोट्याशा संकल्पनेने जन्म घेतला आणि सहा वर्षांपूर्वी गॅजेट फ्री अकॅडमी या संस्थेची संत तुकाराम नगर मध्ये सुरूवात झाली. सुरुवातीला मोबाईल पासून काही काळ विद्यार्थ्यांना दूर ठेवून मैदानी खेळ शिकवावे आणि मैदानी खेळात त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येत आज 200 समाधानी कुटुंबे या ग्रुपला जोडले गेलेली आहेत.

ज्या शाळेच्या आवारात आम्ही हा प्रकल्प सुरू केला त्याच महानगरपालिकेच्या शाळेचे आम्ही माजी विद्यार्थी असून, ज्या शाळेने आम्हाला घडवले मोठे केले त्याच शाळेबद्दल आपले काही उत्तरदायित्व समजून आमची शाळा स्वच्छ सुंदर, चांगली राहावी आणि चांगले उपक्रम राबविण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही याच ठिकाणी या अकॅडमीची सुरुवात केली, व यशस्वी वाटचाल अविरतपणे सुरू आहे. या सहा वर्षात आमच्या स्वतःच्या दोन फुटबॉल टीम, मुलींची क्रिकेट टीम, कबड्डी व खो-खो यांचे प्रशिक्षण वर्ग यांच्या माध्यमातून नियमित व्यायाम घेणे त्यांच्याकडून सराव करून घेणे हे सातत्याने चालू आहे.

आज आमच्यातील काही माजी विद्यार्थी उद्योजक आहेत, काही नोकरी करीत आहेत कोणी मोठे मोठे व्यवसाय करीत आहेत या सर्वांनी आपापल्या परीने या प्रकल्पासाठी मदत करीत असतात, तसेच आमच्या भागातील पालक, नागरिक, नगरसेवक व नगरसेविका देखील यासाठी सहकार्य करीत असून त्यामुळेच हा प्रकल्प आजवर अत्यंत वेगाने वाटचाल करीत आहे.

अकॅडमीच्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून सर्व कामांमध्ये स्वतःला झोकून देऊन तळमळीने काम करणारे 100-125 स्वयंसेवकांना आम्ही अप्पर / झीपर भेटीच्या स्वरूपात देत असून ही केवळ भेट नसून त्यांची जबाबदारी अधिक प्रमाणात वाढविण्यासाठी प्रोत्साहन आहे.

सध्या सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण असून आमच्या संत तुकाराम नगर येथील शाळेची पटसंख्या पूर्वीपेक्षा खूप कमी झालेली आहे कारण त्या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे.

  मी निश्चल मोरे या संस्थेचा संस्थापक असून माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मला वेगवेगळ्या देशांमध्ये सतत फिरावे लागते व अधिकाधिक काळ मी परदेशातच असतो त्या ठिकाणी असणाऱ्या शाळांचे स्वरूप सुविधा या पाहून माझ्या शाळेत देखील अशा प्रकारच्या सुविधा असाव्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासोबतच विविध कौशल्य शिकून त्यात पारंगत व्हावे, यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिकेकडे शिक्षण मंडळातील माननीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या शाळेच्या सर्व सुविधा अद्यावत करून देखभालीचा खर्च देखील आमच्या गॅझेट फ्री अकॅडमीच्या माध्यमातून उभा करून या शाळेला अद्ययावत रूप देऊन शहरातील एक अभ्यास, कौशल्य विकास, व्यक्तिमत्व विकास यासारखे प्रशिक्षण देऊन सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त, शहरातील नावाजलेल्या शाळांच्या तोडीस तोड असलेली शाळा असा नावलौकिक प्राप्त करून शहराच्या कानाकोपऱ्यातून या शाळेतच आपला पाल्याने शिक्षण घ्यावे असे वाटावे अशी शाळा घडवण्याचा आमचा मानस आहे.

माझे व्यवसायाच्या माध्यमातून सध्या चीनमध्ये निवासस्थान आहे त्या ठिकाणच्या शाळांमध्ये अभ्यासासोबतच कौशल्य प्रशिक्षणाची पद्धत विद्यार्थ्यांची जडणघडण मी अत्यंत जवळून वर्षभर पाहत आहे, त्याचमुळे आज ऑलम्पिक मध्ये त्या देशातील खेळाडू सर्वाधिक यशस्वी होताना आपण पाहतो, या माझ्या अनुभवाचा उपयोग महानगरपालिकेने या शाळेची जबाबदारी गॅझेट फ्री अकॅडमी कडे सोपवल्यास आम्हास निश्चित आनंद होऊन दर्जेदार प्रशिक्षण दिले जाईल व त्यातून आपल्या परिसरातील विद्यार्थी नावलौकिक प्राप्त करतील, आज आमच्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून मी सर्व नागरिक पालक यांना आव्हान करतो की आमच्या या उज्वल भावनेतून सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये आपण देखील सहभागी व्हावे व या चांगल्या कार्यास हातभार लावावा.

गॅझेट फ्रि हावर्स अकॅडमीचे राकेश गायकवाड, मायल्या मामा खत्री, महेश देशपांडे, राजू पावले, प्रवीण जाधव,नीलेश खोल्लम, डॉमन्यूक स्पॅम्यूएल, नेल्सन सॅम्युएल, शैलेंद्र भावसार, रियाज इनामदार, बाळासाहेब कलापूरे, आशिष जाधव, अभय सांगळे, सागर गोरे, अमित काटे, अब्दूल मूल्ला, योगेश खोल्लम, नाज़िम शेख,डॉ. सूशिलकुमार शिंदे, मंगेश येरुंकर, गणेश शेलार, अलोसिस इग्नेसिस, सुरेश पाटील, अनिल भोसले, नितिन भावसार, प्रशांत खत्री आदींनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

विशेष म्हणजे हा उपक्रम कोणाच्या खिशावर नाही, तर सभासदाचा खांद्यावर उभा आहे. सगळे आपापल्या परीने हातभार लावत आहेत. वर्धापन दिनी १००-१२५ स्वयंसेवकांचा सन्मान केला जातो, कारण इथे – सन्मान म्हणजे फक्त टाळ्या नाहीत, तर जबाबदारीची पावती असते.

तसेच आमच्या भागातील पालक, नागरिक, नगरसेवक व नगरसेविका देखील यासाठी नैतिक समर्थन करीत असून त्यामुळेच हा प्रकल्प आजवर अत्यंत वेगाने वाटचाल करीत आहे.

गेल्या सहा वर्षाच्या आमच्या वाटचालीमध्ये ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत अत्यंत तळमळीने काम केले व हा प्रकल्प सुरू ठेवला त्या सर्वांचे गॅजेट फ्री अकॅडमी आभारी आहे, आम्ही केलेल्या महानगरपालिकेकडे या शाळेच्या सुधारणेबाबतच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी याच प्रतीक्षेत आम्ही आहोत, याचा फायदा निश्चितच या परिसरातील सर्वे नैपुण्य असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

सौ संगीता घोडेकर प्रशासन अधिकारी यांना निवेदन देताना

मदतीची वाट न पाहता शाळेचा कायापालट! माजी विद्यार्थी स्वबळावर उभारणार क्रीडासंकुल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा
ज्या महापालिकेच्या पंडित दीनदयाळ शाळेने आयुष्याला दिशा दिली, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी ठाम निर्धार केला आहे. कोणत्याही शासकीय किंवा बाह्य मदतीची अपेक्षा न ठेवता, स्वखर्च व स्वश्रमातून शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी केला असून, शाळेचे सुशोभीकरण करताना विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज क्रीडासंकुल उभारण्याची तयारी सुरू केली आहे. केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाबरोबर खेळ, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा उपक्रम शहरासाठी आदर्श ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *