महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ७ फेब्रुवारी २०२६ || जग आज एका विचित्र वळणावर उभं आहे. हातात नोटा आहेत, पण विश्वास नाही; बँक बॅलन्स आहे, पण दिलासा नाही. अशा काळात पुन्हा एकदा एका जुन्या नावाची चर्चा सुरू झाली आहे—भविष्य, संकट आणि इशारे यांचं गूढ समीकरण मांडणाऱ्या त्या अंध भविष्यवाण्यांची. जागतिक अर्थव्यवस्था डगमगतेय, महागाईचा ताप उतरत नाही आणि बाजार रोज नवा धक्का देतोय. या अस्थिरतेत एक धोक्याचा सूर ऐकू येतो—रोकड संपणार नाही, पण तिचं वजन शून्यावर जाईल. कागदी चलन हातात असलं तरी किंमत राहणार नाही, असा इशारा आज अनेक जण आठवण करून देत आहेत. म्हणूनच लोक पुन्हा त्या जुन्या, जड आणि चमकदार सुरक्षिततेकडे वळताना दिसत आहेत—सोने, चांदी, तांबे! इतिहास पुन्हा स्वतःची उजळणी करतोय, फक्त आकडे आणि गोंधळ जास्त आहेत.
गेल्या काही महिन्यांत जे घडलं, ते कुठल्याही सामान्य गुंतवणूकदारासाठी धडकी भरवणारं आहे. सोने आणि चांदीने असे उच्चांक गाठले की, आकडे पाहून डोळे चोळावे लागले. दहा ग्रॅम सोनं ऐंशी-नव्वद हजारांवरून थेट लाखांच्या पुढे गेलं, तर चांदीने किलोमागे लाखांचा पल्ला ओलांडला. काहींनी आनंदात नफा मोजला, तर काहींनी “आता उशीर झाला” असं म्हणत हात आखडते घेतले. आणि मग अचानक… बाजाराने मान हलवली. काही दिवसांतच दर कोसळले, घबराट पसरली, व्हर्च्युअल गुंतवणूकदारांनी घाईघाईत विक्री केली. पण जसं नेहमी होतं, तसंच झालं—घसरण काही काळाची ठरली. पुन्हा दर स्थिर झाले, वर सरकले आणि एक प्रश्न ठळक झाला: ही फक्त चढ-उतारांची खेळी आहे, की मोठ्या आर्थिक वादळाची नांदी?
आज अनेक जण म्हणतात, डॉलर कमकुवत होतोय, जागतिक बाजाराला दिशा उरलेली नाही आणि विश्वासाचं चलन झिजतंय. अशा वेळी लोकांचा कल बदलतोय. एफडी, बचत खाते, रोख रक्कम—या सगळ्यांकडे संशयाने पाहिलं जातंय. उलट, भौतिक संपत्तीला पुन्हा प्रतिष्ठा मिळतेय. कारण संकटात आकडे उडतात, पण धातू टिकतो. हा काळ भविष्यवाण्यांवर अंधविश्वास ठेवण्याचा नाही, तर इतिहासाकडे डोळे उघडे ठेवण्याचा आहे. प्रत्येक आर्थिक संकटानंतर एकच गोष्ट सिद्ध झाली आहे—जिथे विश्वास कोसळतो, तिथे सोनं-चांदी उभं राहतं. प्रश्न एवढाच आहे, हे वादळ कधी आणि किती मोठं येणार? आणि तुम्ही ते येण्याआधी कुठे उभे आहात?
